कोण आहे १६ वर्षीय तसनीम मीर? सिंधू, सायनाला करता आला नाही असा विक्रम
क्रीडा

कोण आहे १६ वर्षीय तसनीम मीर? सिंधू, सायनाला करता आला नाही असा विक्रम

नवी दिल्ली: बॅटमिंटन म्हटले की भारतीय लोकांच्या समोर सर्वात आधी येते ते सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांचे नाव होय. सायनाने देशातील लोकांना बॅटमिंटन पाहण्याची सवय लावली. त्यानंतर सिंधूने दोन वेळा ऑलिंपिक पदक जिंकून या खेळाची लोकप्रियता वाढवली. या दोन्ही स्टार खेळाडूंमुळे अनेकांनी बॅडमिंटन रॅकेट हातात घेतली. त्यापैकी एका खेळाडूने आता इतिहास घडवला आहे.
गुजरातच्या मेहसाणा येथील १६ वर्षीय तसनीम मीरने अशी कामगिरी करून दाखवली आहे जी सायना आणि सिंधू यांना देखील करता आली नाही. तसनीमने १९ वर्षाखालील महिला एकेरी विभागात जगातील अव्वल खेळाडू होण्याचा मान मिळवाल आहे. ज्युनिअर खेळाडू असताना अशी कामगिरी सायना आणि सिंधूसह अन्य कोणालाही आजवर करता आलेली नाही. १९ वर्षाखालील महिला एकेरीमध्ये अशी कामगिरी करणारी तसनीम पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. ज्युनिअर वर्ल्ड रॅकिंग २०११मध्ये सुरू झाली. त्यामुळे सायना यासाठी पात्र ठरली नाही. तर सिंधू या क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली होती.
आजवर कोणाला करता न आलेली कामगिरी केल्यानंतर तसनीम म्हणाली, मी खुप आनंदी आहे. पीव्ही सिंधू आणि सायना नेहवाल यांच्या प्रमाणे बॅडमिंटनला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करते. सिनिअर स्तरावर पुढील ऑलिंपिकमध्ये भारताला पदक मिळवून देण्यासाठी सराव सुरू ठेवणे.

भारताच्या या नव्या स्टार खेळाडूने सांगितले की, एक वेळ अशी आली होती. जेव्हा आर्थिक अडचणींमुळे वडिलांनी माझा खेळ बंद केला होता. पण स्पॉन्सर मिळाले आणि त्यामुळे मी पुन्हा खेळ सुरू केला. आज या ठिकाणी पोहोचले आहे, ते त्यांच्यामुळेच. तसनीमने ३ वर्षी गोपीचंद अकादमीत ट्रेनिंग घेतली आहे. त्यानंतर गुवाहाटी येथील अकदामीत ट्रेनिंग घेत आहे. तसनीमने आतापर्यंत २२ स्पर्धेत विजय मिळवला आहे. एकेरीमध्ये दोन वेळा आशियाई चॅम्पियन देखील झाली आहे.