डायबिटीज, तुमचा नंबर लागू नये म्हणून लगेच करा हे उपाय
लाइफस्टाइल

डायबिटीज, तुमचा नंबर लागू नये म्हणून लगेच करा हे उपाय

आजच्या काळातील काही सामान्य आजारांमध्ये डायबिटीजची गणना केली जाते. सध्या प्रत्येक घरातील कोणी ना कोणी व्यक्ती डायबिटीजच्या विळख्यात आहेच. मधुमेह हा एक दीर्घकाळ टिकणारा आणि चयापचयाशी (metabolism) संबंधित रोग आहे ज्यामुळे कालांतराने हृदय, रक्तवाहिन्या, डोळे, किडनी आणि नसा यांचे गंभीर नुकसान होते. तसं तर टाइप -2 मधुमेह हा सर्वात सामान्य मानला जातो. मात्र नुकताच एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. द लॅन्सेट डायबिटीज अँड एंडोक्रिनोलॉजीच्या रिपोर्टनुसार, हे 10 देश भारत, अमेरिका, ब्राझील, चीन, जर्मनी, स्पेन, कॅनडा, ब्रिटन, रशिया आणि सौदी अरेबियामध्ये टाइप-1 मधुमेहाने ग्रस्त लोकांची संख्या सर्वाधिक आहे.

2021 च्या रिपोर्टनुसार, सध्या सुमारे 8.4 मिलीयन लोक डायबिटीजच्या विळख्यात आहेत, जी संख्या 2040 मध्ये 13.5 मिलीयन ते 17.5 मिलीयनपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत तुम्हालाही या आजाराचा धोका असू शकतो. ही परिस्थिती रोखायची असेल तर वेळीच आवश्यक उपाययोजना करायला सुरुवात करा.

टाइप 1 डायबिटीज काय आहे?

सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अँड प्रिवेंशननुसार, टाइप 1 डायबिटीज एकेकाळी इन्सुलिनवर आधारित किंवा किशोर जुवेनाईल डायबिटीज म्हटले जात असे. हा सामान्यतः मुले, पौगंडावस्थेतील लोक आणि तरुण मुलांमध्ये विकसित होतो. पण हे कोणत्याही वयात होऊ शकते. जर तुम्हाला टाइप 1 मधुमेह असेल तर याचा अर्थ असा की तुमचे स्वादुपिंड इन्सुलिन बनवत नाही किंवा खूप कमी इन्सुलिन बनवतंय.

टाइप 1 आणि टाइप 2 डायबिटीजमधील अंतर

यूकेच्या डायबिटीज ऑर्गनायझेशनच्या मते, टाइप 1 आणि टाइप 2 मधुमेहामध्ये मुख्य फरक असा आहे की टाइप 1 डायबिटीज ही एक आनुवांशिक स्थिती आहे त्यामुळे हा डायबिटीज ब-याचदा लहान वयात होतो. त्याचवेळी, टाइप 2 मुख्यत्वे कालांतराने हळूहळू विकसित होणारा व खराब जीवनशैलीशी संबंधित आहे. टाइप 1 मधुमेहामध्ये, तुमची रोगप्रतिकारक शक्तीच तुमच्या स्वादुपिंडातील इन्सुलिन तयार करणाऱ्या पेशींवर हल्ला करते किंवा त्यांचा नाश करते. त्यामुळे ते इन्सुलिन तयार करू शकत नाहीत.

टाइप 1 डायबिटीजची लक्षणे

  • नेहमीपेक्षा जास्त तहान लागते
  • जास्त लघवी होणे
  • रात्री अंथरूणात लघवीला होणे
  • खूप भूक लागणे
  • वजन कमी होणे
  • चिडचिड होणे
  • थकवा येणे
  • कमजोर व अशक्त वाटणे
  • दृष्टी धूसर होणं

टाइप 1 डायबिटीज होण्याची कारणे

मेयो क्लिनिकच्या मते, टाइप 1 मधुमेहाचे नेमके कारण माहित नाही. सामान्यतः आपल्या स्वतःच्याच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती – जी सामान्यतः हानिकारक बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढते तिच स्वादुपिंडातील इन्सुलिन निर्माण करणा-या आयलेट नावाच्या पेशी नष्ट करते. त्यामुळे एखादी व्यक्ती टाइप-१ मधुमेहाची शिकार होते. हे अनुवांशिकतेशी संबंधित आहे किंवा व्हायरस आणि इतर पर्यावरणीय घटकांच्या संपर्कात येण्याचा परिणाम आहे.

कसा करावा टाइप 1 डायबिटीजपासून बचाव

टाईप 1 मधुमेह टाळण्यासाठी आतापर्यंत कोणताही मार्ग सापडला नाही. परंतु संशोधक हा रोग रोखण्यासाठी आणि निदान झालेल्या लोकांच्या आयलेट पेशींना आणखी नुकसान होऊ नये म्हणून शोध लावत आहेत. पण हा आजार टाळण्यासाठी सकस आहार, नियमित व्यायाम, ब्लड प्रेशर आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवण्यासारखे उपाय तुम्हाला मदत करू शकतात.