भारताच्या प्रणॉयने जागतिक विजेत्या केंटो मोमोटाला केले गारद, पुढची लढत लक्ष्य सेन सोबत
क्रीडा

भारताच्या प्रणॉयने जागतिक विजेत्या केंटो मोमोटाला केले गारद, पुढची लढत लक्ष्य सेन सोबत

टोकियो: सध्या सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताचे अनेक बॅडमिंटन पटू सहभागी झाले आहेत. भारताची स्टार खेळाडू पी. व्ही. सिंधु दुखापतीमुळे हे सामने खेळत नसली तरी देखील तिच्या अनुपस्थितीत भारताचे इतर बॅडमिंटनपटू जबरदस्ती खेळी करताना दिसत आहे. या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये भारताकडून २६ बॅडमिंटन खेळाडू सामील झाले आहेत, त्यापैकि भारताच्या एच. एस. प्रणॉयने आपल्या शानदार खेळीने जागतिक विजेत्या खेळाडूला पराभूत केले आहे.
एच. एस. प्रणॉयने अखेर माजी जागतिक विजेत्या जपानच्या केंटो मोमोटाचा अभेद्य बचाव भेदण्याचे तंत्र शोधून काढले. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी प्रणॉयने सफाईदार खेळ करून मोमोटाला निष्प्रभ केले. या विजयाने प्रणॉयने पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. आठ लढतींतील प्रणॉयचा हा मोमोटावरील पहिलाच विजय ठरला.
स्वतःच्या क्षमतेबाबत शंका असल्यास स्वप्नवत विजय साकारले जात नाहीत, असे प्रणॉय अनेकदा स्वतःला सांगत असतो. मोमोटाविरुद्धच्या सामन्यात आपण जिंकू शकतो हा विश्वास त्याला होता. मोमोटा ऑलिम्पिकमध्ये साखळीत गारद झाला होता. त्यानंतर तो प्रणॉयविरुद्ध पराभूत होईल, असे कोणासही वाटले नव्हते; पण जागतिक क्रमवारीत १८व्या असलेल्या प्रणॉयने दुसऱ्या मानांकित मोमोटाविरुद्ध २१-१७, २१-१६ असा ५४ मिनिटांत विजय मिळवला. प्रणॉयने सुरुवातीपासून आक्रमक खेळ करताना मोमोटाला लय गवसणार नाही, याची काळजी घेतली. “मोमोटाचा खेळ चांगला झाला नाही; पण त्यामुळे विजयाचे महत्त्व कमी होत नाही,” असे प्रणॉयने सांगितले.
प्रणॉय संपूर्ण लढतीत कमालीचा शांत होता. चाहते आपल्या विरोधात असतील याची जाणीव असल्यामुळे त्याने महत्वाचे गुण जिंकल्यावर ‘कमॉन’ असे म्हणून स्वतःला प्रोत्साहित केले. पहिल्या गेमच्या अंतिम टप्प्यात दीर्घ रॅली प्रणॉयने क्रॉस कोर्ट स्मॅशने संपवली. हा स्मॅश परतवण्याच्या प्रयत्नात मोमोटा खाली पडला. आपल्या खेळावर निराश झाल्यामुळे तो काही सेकंद तसाच पडून राहिला. त्याच वेळी जणू लढतीचा निकाल काय लागणार हे स्पष्ट झाले होते.
“मोमोटाच्या खेळात आत्मविश्वासाचा काहीसा अभाव होता. त्याच्या खेळात खूप बदल झाला आहे. त्याच्या खेळाचा चांगला अभ्यास केला होता. त्यामुळे त्याचा बचावही पूर्वीइतका भक्कम वाटला नाही. तो पूर्वीसारखा आत्मविश्वासाने शॉट्स खेळत नाही. कदाचीत दुखापतीमुळे हे घडले असावे,” असेही प्रणॉयने सांगितले. प्रणॉयने अनेकदा दुखापतीनंतर पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर अनेक अव्वल प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केले आहे. एखाद्याचा खेळ कधी बहरात नाही हे तो लगेच ओळखतो. मोमोटाविरुद्धची लढतही अपवाद नव्हती. त्याने आक्रमण आणि बचाव याचा चांगला संगम साधला. त्याने दीर्घ रॅलीजही जिंकून मोमोटावरील दडपण वाढवत नेले.
धडाका कायम
– प्रणॉयचा यापूर्वी लिन दान, तौफिक हिदायत, चेन लाँग, व्हिक्टर अॅक्सेलसन या ऑलिम्पिक विजेत्यांविरुद्ध विजय
– प्रणॉयच्या अचूकतेसमोर ऑलिम्पिक उपविजेता ली चाँग वेई हाही निष्प्रभ
– प्रणॉयला यापूर्वी मोमोटाविरुद्धच्या आठ लढतींत केवळ एकच गेम जिंकता आली होती.

“मोमोटाविरुद्ध कोणतीही चूक परवडणार नाही, याची पूरेपूर कल्पना होती. सामन्यावरील नियंत्रणही कधी गमावले नाही. त्याचबरोबर सामन्यातील महत्वाचे गुण जिंकण्याकडे लक्ष दिले. महत्वाच्या सामन्यात शांतपणे खेळ करणे गरजेचे असते. त्यात नक्कीच यश आले. अर्थात कधीही खेळ उंचावण्यास संधी असते.” असे एच. एस प्रणॉय म्हणाला.