Fifa : फीफाचा फुटबॉल महासंघाबाबत मोठा निर्णय, महिला विश्व कप स्पर्धेविषयी मोठी अपडेट
क्रीडा

Fifa : फीफाचा फुटबॉल महासंघाबाबत मोठा निर्णय, महिला विश्व कप स्पर्धेविषयी मोठी अपडेट

नवी दिल्ली : १७ वर्षा खालील महिला फुटबॉल विश्व कप स्पर्धेच्या भारतातील आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. फुटबॉलची जागतिक संघटना फीफा (FIFA) ने अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (AIFF) वर लावलेली बंदी उठवली आहे . सुप्रीम कोर्टानं महासंघावरील प्रशासक मंडळ बरखास्त केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतातील फुटबॉल प्रेमींसाठी ही दिलासादायक बातमी आहे. फीफानं भारतीय फुटबॉल महासंघातील त्रयस्थ हस्तक्षेपाच्या मुद्यावरुन १५ ऑगस्ट रोजी बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. ही बंदी सुप्रीम कोर्टानं प्रशासक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय घेतल्यावर फीफाकडून उठवण्यात आली आहे.
फीफानं भारतीय फुटबॉल महासंघाला नियमित कामांसाठी समिती नेमण्याची परवानगी मिळताच बंदी उठवण्याचा निर्णय घेतला. फीफानं बंदी उठवल्यांन ११ ते ३० ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या १७ वर्षांखालील महिला विश्वकप स्पर्धेचं आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फीफानं भारतीय फुटबॉल महासंघाच्या निवडणुकीसाठी मदत करण्याचं आश्वासन देखील दिलं आहे.
सुप्रीम कोर्टानं सोमवारी भारतीय फुटबॉल महासंघाच्या कामावर नियंत्रण ठेवणाऱ्या तीन सदस्यांच्या समितीला भंग करण्याचा निर्णय घेतला. सुप्रीम कोर्टानं महासंघाच्या दररोजच्या कामासाठी प्रभारी महासचिव काम पाहतील, असं म्हटलं. एआयएफएफच्या कार्यकारी समितीची स्थापना देखील करण्यात येणार आहे. नव्या कार्यकारी समितीमध्ये २३ सदस्य असतील. यामध्ये सहा खेळाडू असतील आणि त्यामध्ये दोन महिला खेळाडूंचा समावेश करण्यात येणार आहे. कोर्टानं २८ ऑगस्टला होणाऱ्या निवडणुकीला ८ दिवस लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय फुटबॉल महासंघाच्या नव्या मतदार यादी राज्य आणि केंद्रशासीत प्रदेशांचे ३६ प्रतिनिधी असतील, त्यामध्ये खेळाडूंना संधी नव्हती. सुप्रीम कोर्टानं ३ ऑगस्टला ३६ फुटबॉल खेळाडूंना निर्वाचन मंडळात संधी देण्याचा निर्णय घेतला होता. फीफानं या प्रकरणामध्ये त्रयस्थ यंत्रणेचा हस्तक्षेप असल्याचं समजत भारतीय फुटबॉल महासंघावर बंदी घातली होती. ती आता माघारी घेतल्यानं भारतातील १७ वर्षीय फुटबॉल विश्वकप स्पर्धेचा मार्ग मोकळा झाला आहे.