दर सर्वसामान्यांना परवडणार का?
पर्यटन

दर सर्वसामान्यांना परवडणार का?

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची रिसॉर्ट सर्वसामान्यांना परवडणारी आणि विश्वासार्ह आहेत. खासगीकरणानंतर रिसॉर्ट चकाचक होतील; पण त्याचे दर सगळ्यांच्या आवाक्यात राहतील का, सरकारने करार करताना खासगी विकासकांच्या दरपत्रकांवर बंधने घातली आहेत का, असे प्रश्न पुढे आले आहेत. पर्यटकांसाठी दर्जेदार सुविधा देण्याचे कारण सांगून राज्य सरकारने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) महाबळेश्वर, माथेरानसह अन्य तीन ठिकाणी मोक्याच्या जागांवरील रिसॉर्ट खासगी उद्योजकांना भाडेतत्त्वावर दिली आहेत. पुढील दोन महिन्यांत अजून दोन रिसॉर्टचा खासगी विकासकांबरोबर करार होणार आहे. या करारामध्ये रिसॉर्टच्या नूतनीकरणाचे आणि रिकाम्या जागेत उपलब्ध चटई क्षेत्र निर्देशांकानुसार नवीन बांधकामासही परवानगी दिली आहे. यात ताडोबा रिसॉर्ट, सिंधुदुर्गमधील मिठबाव आणि हरिहरेश्वर येथील रिसॉर्टचा समावेश आहे. करार तीस वर्षांसाठी करण्यात आला असून, रिसॉर्टची देशभर मालिका असलेल्या मोठ्या पर्यटन कंपन्या यामध्ये सहभागी झाल्या आहेत. यामध्ये काही कंपन्या पंचतारांकित आहेत. ‘एमटीडीसी’च्या पाचही रिसॉर्टमध्ये किमान दोन हजार रुपयांपासून ते साडेचार हजार रुपयांपर्यंत खोलीच्या प्रकारानुसार भाडे आकारले जाते. अनोळखी ठिकाणी राहायला जाण्यापेक्षा पर्यटन महामंडळाच्या रिसॉर्टला कौटुंबिक सहलीसाठी नेहमीच प्राधान्य मिळत आले आहे. ज्येष्ठ नागरिकांचीही ‘एमटीडीसी’च्या रिसॉर्टला विशेष पसंती मिळते. त्यामुळे तिन्ही ऋतूंमध्ये या रिसॉर्टला सर्वाधिक मागणी होती. नव्या करारामुळे ‘एमटीडीसी’च्या रिसॉर्टचे दर वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.