सावधान! राजस्थानमध्ये पर्यटनाला जाताय? मग त्यापू्र्वी ही बातमी नक्की वाचा…
पर्यटन

सावधान! राजस्थानमध्ये पर्यटनाला जाताय? मग त्यापू्र्वी ही बातमी नक्की वाचा…

जैसलमेर : जैसलमेरचा १००० कोटींचा पर्यटन उद्योग धोक्यात आला आहे. याला कारण म्हणजे पर्यटकांची होणारी फसवणूक आणि सततच्या गैरवर्तनाच्या घटना. पर्यटकांकडून पैसे उकळण्यासाठी इथे बनावट रिसॉर्ट सुरू आहेत. पर्यटकांचा विनयभंग आणि त्यांना मारहाण केली जात आहे.

राजस्थानच्या सम क्षेत्रात १०० हून अधिक बनावट रिसॉर्ट्स आहेत. बनावट रिसॉर्ट चालवणारे लोक ऑक्टोबर ते फेब्रुवारी दरम्यान अधिक सक्रिय असतात. विशेषत: दिवाळी आणि नवीन वर्षाच्या हंगामात भरपूर बुकिंग असते. हे रिसॉर्ट गुगलवरही नोंदणीकृत आहेत.

रिसॉर्टचे ऑनलाइन बुकिंग केले, पण निर्जन स्थळी दिले दोन तंबू

अहमदाबादचे रहिवासी दीपक जाट यांनी मरुधारा रिसॉर्टमध्ये ऑनलाइन दोन तंबू बुक केले. ते जैसलमेरला पोहोचणार होते तेव्हा रिसॉर्टच्या कर्मचाऱ्यांनी संपर्क साधला आणि गाडीचा नंबर घेतला आणि त्यांना गाडीसर चौराहा येथून पिकअप करण्यात आले. एका हॉटेलमध्ये त्यांना नेण्यात आले आणि त्यांच्याकडून १५ हजार रुपये उकळले. आणि सम सँड ड्यूंस येथे सर्व व्यवस्था केल्याचे सांगून त्यांना रवाना केले. दीपक सम येथे कुटुंबासह रवाना झाले.

तीन तास भटकूनही मरुधारा रिसॉर्ट सापडला नाही. त्याच्याकडून पैसे घेतलेल्या तरुणांनी फोनही उचलला नाही. अखेर रात्री ९ वाजता एक तरुण भेटला आणि मरुधारा रिसॉर्ट सांगून त्याला सोबत घेऊन गेला. निर्जन भागात दोन तंबू होते. थोडं अन्न ठेवलं आणि ते खाऊन तंबूत झोपायला सांगितलं. त्यात तंबून प्यायला पाणीही नव्हतं आणि शौचालयाची कुठलीही व्यवस्था नव्हती.

१५ हजारांत हे काय देताय? असे दीपकने विचारले. आवडले नाही, तर पळा इथून. पैसे परत मिळणार नाहीत, असे उत्तर त्याला मिळालं. दीपक कुटुंब होता. यामुळे त्याने गप्प बसणेच योग्य ठरवलं. ही घटना केवळ दीपक जाटसोबतच नाही, तर रोज डझनभर पर्यटकांसोबत घडते. पण पोलिसांच्या रेकॉर्डपर्यंत पोहोचत नाही.

ट्रॅव्हल वेबसाइट्सवरही नोंदणी

बनावट रिसॉर्ट चालवणारे चतुराईने ट्रॅव्हल वेबसाइटच्या अधिकाऱ्यांना इतर रिसॉर्ट्स दाखवून नोंदणी करून घेतात. अशा वेबसाइट्सवर सुमारे १०० बनावट रिसॉर्ट्सची नोंदणी आहे. हे रिसॉर्ट्स प्रत्यक्षात अस्तित्वात नाहीत. पर्यटकांना अशा बनावट रिसॉर्टसंबंधी अनेक तक्रारी केल्याचं कमेंट्समधून दिसून येईल. बुकिंग दुसऱ्या रिसॉर्टच्या नावावर आहे आणि आपल्याला भलतीकडेच कुठेतरी थांबवलं गेलं, असं त्यांनी म्हटलं आहे.

गुगलच्या लेटरवरून सेट केले लोकेशन

बनावट रिसॉर्ट चालवणारे इतके चालाक आहेत की त्यांनी गुगल मॅपवर बनावट रिसॉर्ट लोकेशनही सेट केले आहे. गुगलकडूनही यावर टपाल पाठवण्यात येते. हे लोक टपाल खात्याकडून पत्र मिळाल्यावर आणि त्यांचे ठिकाण निश्चित करतात. अनेकांनी मोकळ्या मैदानांवर रिसॉर्ट दाखवले आहे. सम भागामध्ये असे सुमारे १०० बनावट रिसॉर्ट्स आहेत. तर गुगल मॅपवर त्यांची संख्या २०० पेक्षा जास्त आहे. म्हणजेच १०० हून अधिक बनावट रिसॉर्ट सुरू आहेत.

तक्रार आल्यास कारवाई करूः पोलीस

पोलिसांकडे तक्रार घेऊन आल्यावर संबंधितांवर नक्कीच कारवाई केली जाईल, असं जैसलमेरचे पोलीस अधीक्षक नरेंद्र चौधरी म्हणाले. आमच्याकडे एका पर्यटकाचे पत्र आले आहे. त्यानुसार परिस्थिती खूपच वाईट आहे. जे पर्यंटक पोलिसांकडे तक्रार घेऊन येतील, त्यानुसार आरोपींवर कारवाई केली जाईल. पण भीतीमुळे अनेक पर्यटक तक्रार करत नसतील. पण पर्यटकांना याबाबत जागरूक करण्याचा आमचा प्रयत्न असेल. यामुळे न घाबरता ते पोलिसांकडे तक्रार करू शकतील, असं पोलीस अधीक्षक चौधरी म्हणाले. दैनिक भास्करने हे वृत्त दिले आहे.

ट्रॅव्हल वेबसाइटना बनावट रिसॉर्टसंबंधी केली सूचना

सम वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष कैलाश व्यास यांनी याबाबत माहिती दिली. ‘सम भागात मोठ्या प्रमाणात बनावट रिसॉर्ट्स सुरू आहेत. यापूर्वीही आम्ही अशा बनावट रिसॉर्ट्सची यादी ट्रॅव्हल वेबसाइटला देऊन यादीतून काढून टाकली होती. तरीही देशी-विदेशी पर्यटकांचा भ्रमनिरास होऊ नये आणि त्यांच्या तावडीत अडकू नये, यासाठी सर्वच ट्रॅव्हल्स वेबसाइट्सना या बनावट रिसॉर्ट्सची माहिती देण्यात आली आहे, असं कैलास व्यास यांनी सांगितलं.