सात भारतीय खेळाडूंना करोनाची लागण; स्पर्धेतून माघार घेतली
क्रीडा

सात भारतीय खेळाडूंना करोनाची लागण; स्पर्धेतून माघार घेतली

नवी दिल्ली: इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेत करोनाचा स्फोट झालाय. बॅडमिंटन फेडरेशनने दिलेल्या माहितीनुसार ७ भारतीय खेळाडूंना करोनाची लागण झाली असून या सर्वांनी स्पर्धेतून नाम मागे घेतले आहे.
काही मीडिया रिपोर्ट्स नुसार किदांबी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा, रितिका राहुल ठकर, तृसा जॉली, मिथून मंजूनाथ, सिमरन अमन सिंह, खुशी गुप्ता यांना करोनाची लागण झाली आहे. अर्थात बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनने करोना पॉझिटिव्ह खेळाडूंची नावे सांगितलेली नाहीत. या सर्व खेळाडूंची १२ जानेवारी रोजी आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आली होती. या खेळाडूंचे ज्याच्या सोबत लढती होत्या त्या सर्वांना पुढील फेरीसाठी वॉकओव्हर दिलाय. स्पर्धेतील दुसऱ्या फेरीतील सामने गुरुवारी होणार आहेत.
इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धाची सुरुवात ११ जानेवारी रोजी झाली होती. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बी.साई प्रणीत आणि ध्रुव रावत यांना करोनाची लागण झाली होती. त्यामुळे इंग्लंडच्या संघाने या स्पर्धेतून माघार घेतली होती. इंडिया ओपन स्पर्धा ही वर्ल्ड टूर सुपर ५००चा एक भाग आहे. १६ जानेवारीपर्यंत ही स्पर्धा असणार आहे. या स्पर्धेत भारतासह जगभरातील अनेक स्टार खेळाडू भाग घेतात.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी सायना नेहवाल, लक्ष्य सेन, एचएस प्रणॉय दुसऱ्या फेरीत पोहोचले होते. स्टार बॅडमिंटनटू पीव्ही सिंधू देखील दुसऱ्या फेरीत पोहोचली आहे.