टी-२० क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड; कोणत्याही सलामीच्या जोडीला असं करता आलं नाही
क्रीडा

टी-२० क्रिकेटमध्ये नवा वर्ल्ड रेकॉर्ड; कोणत्याही सलामीच्या जोडीला असं करता आलं नाही

इंग्लंडचा संघ सध्या पाकिस्तानच्या दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात ७ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. मालिकतील पहिली लढत इंग्लंडने जिंकली होती. दुसऱ्या लढतीत मात्र पाकिस्तानने धमाकेदार विजय मिळवला. पाकिस्तानच्या या विजयात एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड देखील झाला आहे.

दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानला २०० धावांचे टार्गेट दिले होते. पाकिस्तानने विजयाचे लक्ष्य १९.३ षटकात एकही विकेट न गमावता पार केले. या विजयासह कर्णधार बाबर आझम आणि विकेटकीपर मोहम्मद रिझवान यांनी एक नवा वर्ल्ड रेकॉर्ड केला.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने टी-२० क्रिकेटमधील दुसरे शतक पूर्ण केले. त्याने ६६ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांसह ११० धावा केल्या. तर मोहम्मद रिझवानने ५१ चेंडूत नाबाद ८८ धावा केल्या. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सहाव्यांदा एखाद्या सलामीच्या जोडीने २००पेक्षा अधिक धावांची भागिदारी केली आहे.

या दोघांनी गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १९७ धावांची भागिदारी केली होती. आता त्यांनी धावांचा पाठलाग करताना सलामीच्या जोडीसाठीची सर्वोच्च भागिदारी करण्याचा विक्रम देखील केला. बाबर-रिझवान जोडीने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन आणि मार्टिन गुप्टिल यांचा विक्रम मागे टाकला. या दोघांनी नाबाद १७१ धावा केल्या होत्या.

धावांचा पाठलाग करताना झालेली सर्वोच्च भागिदारी

  • बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान- नाबाद २०३
  • केन विलियमसन आणि मार्टिन गुप्टिल- नाबाद १७१
  • एलेक्स हेल्स आणि मायकल लंब- नाबाद १४३

विराटला मागे टाकले
इंग्लंडविरुद्धच्या शतकी खेळीने बाबरने टी-२० क्रिकेटमध्ये ८ हजार धावांचा टप्पा पार केला. त्याने २१८ डावात ही कामगिरी केली. याबाबत बाबरने विराट कोहलीला मागे टाकले, विराटने यासाठी २४३ डाव खेळले होते. याबाबत अव्वल स्थानावर वेस्ट इंडिजचा क्रिस गेल असून त्याने २१३ डावात ८ हजार धावा पूर्ण केल्या होत्या.