budget 2022 : अर्थसंकल्पाची काँग्रेसकडून ‘चिरफाड’! चिदम्बरम बरसले, ”अमृतकाल’ उजाडेपर्यंत वाट बघायची का?’
अर्थविश्व

budget 2022 : अर्थसंकल्पाची काँग्रेसकडून ‘चिरफाड’! चिदम्बरम बरसले, ”अमृतकाल’ उजाडेपर्यंत वाट बघायची का?’

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन ( nirmala sitharaman ) यांनी आज २०२२-२३ चा अर्थसंकल्प ( budget 2022 ) मांडला. पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्री आणि भाजप सर्वच प्रमुख नेत्यांनी अर्थसंकल्पाचं कौतुक केलं. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक असल्याचं म्हटलं. पण काँग्रेसने या अर्थसंकल्पाची ‘चिरफाड’ करत हा ‘लॉलीपॉप बजेट’ असल्याची टीका केली आहे. काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बमर ( chidambaram ) यांनी अर्थसंकल्पावरून केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या ऐवजी आज अर्थमंत्र्यांनीच क्रिप्टोकरन्सी देशात वैध असल्याचे म्हटले आहे. हा निर्णय देशातील भांडवलशाहांचा सांगण्यावरून घेतला आहे. देशाच्या ९९.९९ टक्के नागरिकांसाठी हा निर्णय नुकसानदायक आहे, असं चिदम्बरम म्हणाले.

दीड तासाच्या अर्थसंकल्पाच्या भाषणात ‘गरीब’ शब्दाचा उल्लेख फक्त दोन वेळा करण्यात आला. भारतात श्रीमंत अधिक गडगंज होत चालले आहेत. देशात एकूण १४२ सर्वाधिक श्रीमंत आहेत. सरकारकडे येणारा एकूण पैसा हा ४२ लाख कोटी रूपये आहे. पण या श्रीमंतांच्या संपत्तीत जवळपास ३० लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे हे श्रीमंत लवकरच सरकारलाही मागे टाकतील, अशी शक्यता चिदम्बरम यांनी व्यक्त केली. ,

चिदम्बरम यांनी मांडले प्रमुख मुद्दे

अर्थसंकल्पीय भाषणापूर्वी सरकार आणि अर्थमंत्री सीतारामन यांनी काय लक्षात घ्यायला हवे होते? हे माजी अर्थमंत्री चिदम्बरम यांनी सांगितले. भारताची अर्थव्यवस्था अद्याप महामारीपूर्व पातळीपर्यंत पोहोचलेली नाही. गेल्या दोन वर्षांत लाखो नागरिकांच्या नोकऱ्या गेल्या, काहींनी कायमचा रोजगार गमावला. या दोन वर्षांत ८४ टक्के कुटुंबांच्या उत्पन्नाला मोठा धक्का बसला आहे. दरडोई उत्पन्न वाढण्याऐवजी कमी होत आहे. सुमारे ४.६ कोटी नागरिक अत्यंत गरिबीत ढकलले गेले आहेत. याशिवाय चिदम्बरम यांनी ग्रामीण भारतातील मुलांचे शिक्षण, मुलांमधील कुपोषण, ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये भारताची घसरण आणि शहरी भागातील बेरोजगारीचा दर यांचा उल्लेख केला.

या गंभीर आव्हानांना तोंड देण्यासाठी अर्थसंकल्पात काय केले गेले? हा प्रश्न अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आम्ही स्वतःला विचारला. पण आम्हाला काहीच उत्तर मिळाले नाही, असं चिदम्बरम बोलले. सरकार जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकार योग्य मार्गावर असल्यासारखे दाखवते आणि वागते आहे. नागरिकांच्या महत्त्वाच्या प्रश्नांपर्यंत पोहोचतोय. पण हे सगळं चुकीचं आहे. त्यातून लोकांचा अनादर दिसून येतोय, असा आरोप चिदम्बरम यांनी केला.

पुढील २५ वर्षांच्या विकासाचा संदर्भ देत सरकारने याला ‘अमृतकाल’ असे नाव दिले. चिदंबरम यांनी याची खिल्ली उडवली. अर्थमंत्री पुढील २५ वर्षांचा रोडमॅप तयार करत आहेत. याचे मला आश्चर्य वाटले. सध्या कोणत्याही मुद्द्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे सरकारचे मत आहे. आणि वर्तमानात राहणाऱ्या नागरिकांना अमृतकाल उजाडेपर्यंत निवांत बसून वाट पाहण्यास सांगता येईल का? ही भारतातील जनतेची विशेषतः गरीब आणि दलितांची चेष्टा करण्याशिवाय काही नाही, असा गंभीर आरोप चिदम्बरम यांनी केला.