पर्यटकांच्या उत्साहावर ऐन पावसाळ्यात पाणी, देवकुंड धबधबा ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद
पर्यटन

पर्यटकांच्या उत्साहावर ऐन पावसाळ्यात पाणी, देवकुंड धबधबा ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद

पुणे: पर्यटकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव पुणे-रायगड हद्दीवरील वनक्षेत्रातील देवकुंड धबधबा पर्यटकांसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षात चार पर्यटकांचा ओढा ओलांडताना मृत्यू झाला होता. तसेच वाट चुकण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत होत्या. त्यापार्श्वभूमिवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

महसूल आणि वन विभागातर्फे आजपासून देवकुंड आणि सिक्रेट पॉइंट सणसवाडी या दोन्ही धबधब्यांच्या परिसरात १४४ (१), (४) प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत.

पर्यटकांची गर्दी नियंत्रणात येत नाही म्हणून धबधबे, तलाव आणि किल्ल्यांवर पर्यटकांचा थेट प्रवेश बंद करण्याची भूमिका सध्या प्रशासनाने घेतली आहे. गेल्याच आठवड्यात खालापूर परिसरातील झेनिथ धबधबा, बोरघाट धबधबा, वीणानगर धबधबा, आत्करगाव धबधबा, आडोशी पाझर, वावर्ले अशी एकूण सोळा ठिकाणांवर प्रशासनाने बंदी जाहीर केली आहे.

मात्र, पावसाळी पर्यटनातून मिळणारा रोजगार गेल्यामुळे स्थानिकांचा या बंदीला विरोध होतो आहे.