फेसबुक आणि इन्स्टाग्रामला ‘दहशतवादी संघटना’ म्हणत रशियानं घातली बंदी
ताज्या बातम्या

फेसबुक आणि इन्स्टाग्रामला ‘दहशतवादी संघटना’ म्हणत रशियानं घातली बंदी

Russia Bans Instagram Facebook : रशिया आणि युक्रेन युद्धादरम्यान रशियाच्या एका न्यायालयानं ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’ला दहशतवादी संघटना घोषित करत बंदी घातलीय.

मॉस्को, रशिया :

रशिया आणि युक्रेन युद्ध सुरू होऊन आता जवळपास महिना पूर्ण होतोय. आज या युद्धाचा २७ वा दिवस… युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चेची तयारी दर्शवली असली तर रशियाकडून मात्र युक्रेनच्या शहरांवर हल्ले सुरूच आहेत. रशियाचा उद्दामपणा रोखण्यासाठी जगातील अनेक देशांनी या देशावर आणि देशातील महत्त्वाच्या व्यक्तींवर अनेक आर्थिक निर्बंध लादलेत. दुसरीकडे, रशियानं तणावपूर्ण परिस्थितीत सोशल मीडिया वेबसाईट ‘फेसबुक’ आणि ‘इन्स्टाग्राम’वर बंदी घातलीय.

विशेष म्हणजे, युक्रेनवर हल्ला चढवणाऱ्या रशियानं फेसबुक आणि इन्स्टाग्रामला ‘दहशतवादी संघटना’ म्हणून घोषित करत ही बंदी घातलीय. अनेक कंपन्या देश सोडून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना रशियन न्यायालयानं हा निर्णय सुनावलाय.

याअगोदर, रशियाचं न्यूज आऊटलेट ‘आरटी’ तसंच ‘स्पुतनिक’चा अॅक्सेस ब्लॉक करण्याची घोषणा ‘मेटा’नं (फेसबुक) केली होती. तर ‘ट्विटर’कडून रशियाची सरकारी मीडियाची कन्टेन्ट व्हिजिबिलिटी आणि एम्प्लिफिकेशन घटवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता.

इतर कंपन्यांनीही रशियातून गुंडाळला गाशा

अनेक देशांनी रशियावर आर्थिक निर्बंध घातल्यानंतर देशातील सर्वात मोठी डेअरी प्रोडक्ट कंपनी Danone, कोका कोला या कंपन्यांनीही आपला गाशा गुंडाळण्याची घोषणा केलीय. शूज कंपनी ‘नाईके’ आणि होम फर्निशिंग निगडीत स्वीडिश कंपनी ‘आयकिया’ यांनीही रशियात आपले स्टोअर्स तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्याचा निर्णय घेतलाय.