पर्यटन स्थळांवरून दहा लाखांची दंडवसुली
पर्यटन

पर्यटन स्थळांवरून दहा लाखांची दंडवसुली

करोनाचा प्रादुर्भाव कायम असल्याने प्रशासनाकडून सातत्याने गर्दी टाळण्याचे आवाहन करण्यात येऊनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटन स्थळांवर जमावबंदी लागू केली असतानाही, शनिवारी आणि रविवारी नागरिकांनी पर्यटन स्थळी गर्दी केल्याचे पोलिसांनी केलेल्या आकडेवारीवरून दिसून येते. गेल्या दोन दिवसात १३०० जणांवर कारवाई करून, दहा लाख रुपये दंड वसूल केला आहे.

पालकमंत्री अजित पवार यांच्या सुचनेनुसार पुणे जिल्हाधिकारी यांनी पर्यटन स्थळांवर शुक्रवारी जमावबंदीचे आदेश दिले होते. गेले दोन दिवस त्याची अंलबजावणीही केली जात आहे. त्यानुसार पोलिसांनी ठिकठिकाणी रस्त्यांवर नाकाबंदीदेखील केली होती. मात्र, त्यानंतरही पर्यटन थांबलेले नाही. पुणे ग्रामीण पोलिसांनी शनिवारी ५६० आणि रविवारी ८१० पर्यटकांवर कारवाई केली, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिली.

ग्रामीण पोलिसांनी भोर, वेल्हा, पौड, हवेली, कामशेत, लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण, जुन्नर आणि घोडेगाव पोलिस ठाण्यांच्या हद्दीत पर्यटकांवर कारवाईसाठी पथके नेमली होती. भोर, वेल्हा, मुळशी, लोणावळा, खडकवासला आणि पानशेत येथे सर्वाधिक कारवाई झाली आहे. खकवासला, लोणावळा, सिंहगड, ताम्हिणी घाट या जास्त गर्दीच्या ठिकाणी होणारी कारवाई लक्षात घेऊन काही नागरिकांनी जुन्नर, आंबेगाव, वेल्हा तालुक्यातील पर्यटन स्थळे गाठल्याचे दिसून येते.