कृषी पर्यटनाला ‘रानझोपडी’चे बळ
पर्यटन

कृषी पर्यटनाला ‘रानझोपडी’चे बळ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

उच्च शिक्षणाची मोहोर नावापुढे लागल्यानंतर शहरी झगमगाट अन् भरभराटीच्या स्वप्नांचे आकर्षण प्रत्येकास अटळ आहे. मात्र, या समजाला छेद देत सुरगाणा तालुक्यातील आदिवासी युवकाने अभियंता झाल्यानंतरही ऑटोमोबाइल्सच्या क्षेत्रात जाऊन वाहने अन् यंत्रांच्या दुनियेशी मैत्री करण्याऐवजी पारंपरिक शेतात ‘रानझोपडी’ उभारून ‘फॅमिली कॅम्प’ या संकल्पनेची जोपासना केली आहे.

हर्षद थविलचा हा कल्पक प्रयोग वारली कृषी क्षेत्रातील नव्या प्रवाहांकडे लक्ष वेधणारा ठरला आहे. सुरगाण्यासारख्या आदिवासी आणि दुर्गम तालुक्यातील शेतकरी कुटुंबातून आलेला हर्षद अभियांत्रिकीच्या शिक्षणानंतरदेखील मातीशी पूर्णत: नाळ जोडून आहे. ‘मेकॅनिकल इंजिनीअरिंग’मध्ये कोल्हापूरमधून पदविका घेतल्यानंतर त्याने सिन्नर (जि. नाशिक) नजीकच्या सर विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून ‘मेकॅनिकल इंजिनीअरिंग’मध्ये सन २०१७ मध्ये पदवी घेतली. त्यानंतर शहरात स्थिर होण्याचा पर्याय हाती असताना त्याने वडिलांच्या पारंपरिक शेतीत अभिनव प्रयोग करण्याचे स्वप्न बघितले. गावातून आई-वडिलांना शहरात आणण्याऐवजी त्यानेच गावाची वाट धरत पारंपरिक आठ एकर शेतीपैकी अवघ्या अर्धा एकर परिसरात ‘रानझोपडी’नामक संकल्पना साकारली आहे. शहरातील दगदगीच्या वातावरणास कंटाळलेल्या माणसाला आदिवासी ग्रामिण जीवनपद्धतीची अनुभूती यावी, या सूत्रावर ‘रानझोपडी’ ही संकल्पना आधारली आहे.

दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन व संरक्षण

बालपणापासून शेती-मातीत रमणाऱ्या हर्षदला डोळ्यांदेखत नष्ट होणाऱ्या आयुर्वेदिक वनस्पती, आदिवासी दुर्गम भागातील झाडे टिकविण्याची चिंता वाटे. याच मानसिकतेतून त्याने या दुर्मिळ कलमांची लागवडही ‘रानझोपडी’च्या आसपास केली आहे. याशिवाय ‘कॉफी’, ‘कोको’, ‘लिची’, ‘मंगोस्टोन’, ‘स्टार फ्रूट’ आदी विदेशी वृक्षांच्या प्रजातींचीदेखील लागवड त्याने या परिसरात केली आहे.

हर्षद हा अभियंता असण्यासोबतच उत्तम वारली चित्रकारदेखील आहे. सध्या सर्वत्र प्रचलित असणाऱ्या वारली चित्रकलेच्या संकल्पनेवर राज्यातील इतर आदिवासीबहुल भागांचा प्रभाव विशेषत: दिसून येतो. मात्र, सुरगाण्याची वारली चित्रशैली काहीशी भिन्न असल्याचे त्याचे निरीक्षण आहे. त्याच्या निरीक्षणातून उदयाला येणारी अनोखी वारली चित्रेदेखील रानझोपडीचा अविभाज्य भाग झाली आहेत. याशिवाय ‘वीकएण्ड’ला या रानझोपडीचा पाहुणचार घेणाऱ्या पाहुण्यांच्या पारंपरिक आदिवासी अगत्य व खानपान पद्धतीतून केल्या जाणाऱ्या सरबराईमुळे अनेक जण ‘रानझोपडी’तील वास्तव्याला आता पसंती देऊ लागले आहेत.

शहरे व तेथील विकास गरजेचाच आहे. पण, विकासासाठी केवळ शहरातच जावे लागते हा समज ‘रानझोपडी’मुळे मोडीत काढता आला. अभियांत्रिकी शिक्षणानंतरही गावाची-मातीची ओढ आणि शेतीमधील आवड यामुळे येथे नवी संकल्पना राबविली. कृषी पर्यटनापेक्षाही दुर्मिळ वृक्ष प्रजातींचे संरक्षण व संवर्धन हा मुख्य हेतू आहे. यातूनच हा नवा प्रवास सुरू झाला आहे.

-हर्षद थविल, संचालक, रानझोपडी कृषी पर्यटन प्रकल्प

————–

-पारंपरिक शेतात ‘रानझोपडी’ उभारून ‘फॅमिली कॅम्प’

-‘मेकॅनिकल इंजिनीअरिंग’नंतर धरली गावाची वाट

-अर्थ्या एकरात ‘रानझोपडी’नामक संकल्पना साकारली

-दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन व संरक्षणास प्राधान्य

-विदेशी वृक्ष प्रजातींचीदेखील परिसरात लागवड