देशांतर्गत सहली सुसाट
पर्यटन

देशांतर्गत सहली सुसाट

करोना साथरोगामुळे खीळ बसलेल्या पर्यटन व्यवयासाला उन्हाळी सुट्ट्यांमध्ये चालना मिळाली असून, काश्मीर, चारधाम, गुजरातसह देशभरातील जंगल पर्यटनाला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळातो आहे. दिवाळीपाठोपाठ उन्हाळी सुट्ट्यांमध्येही देशांतर्गत सहली ‘हिट’ ठरल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील बंधने बहुतांश देशांनी शिथिल केली असली, तरी पर्यटकांनी भारतातील प्रेक्षणीय, निसर्गरम्य स्थळी भटकंती करण्यास प्राधान्य दिले आहे. लॉकडाउनमुळे दोन वर्षे बंद असलेले पर्यटन क्षेत्र दिवाळीनंतर सक्रिय झाले; पण जानेवारीत करोनाची तिसरी लाट आल्याने फेब्रुवारी अखेरपर्यंत पुन्हा अडथळे निर्माण झाले होते. उन्हाळ्याची सुरुवात पर्यटनासाठी सकारात्मक ठरली. एप्रिलमध्ये अनेक जण सहलीला जाऊन आले आहेत, तर शेवटच्या आठवड्यात जाण्याचे बेत आखले जात आहेत. मे आणि जून महिन्यातील सहलींचे बुकिंग जोरात सुरू आहे.

ज्येष्ठ नागरिकांचे करोना प्रतिबंधक लसीकरणाचे आता तीन डोस झाल्याने त्यांचे मोठे गट चारधाम यात्रेला निघाले आहेत. कौटुंबिक सहलींनीही काश्मीरला पसंती दर्शवली आहे. पर्यटन कंपन्यांच्या माहितीनुसार काश्मीर, चारधाम यात्रेला यंदा देशभरातून ऐतिहासिक प्रतिसाद मिळाला आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सहलींना सुरुवात झाली. शाळांना सुट्ट्या सुरू होणार असल्याने मे महिन्यात कौटुंबिक सहलींचे बुकिंग अधिक झाले आहे.

हॉटेल दर, विमान प्रवास महागला

गेल्या महिनाभरापासून पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन अनेक हॉटेलचालकांनी खोल्यांचे दर दुप्पट केले आहेत. रिसॉर्टमधील जेवण आणि इतर सुविधा महाग झाल्या आहेत. बुकिंग कॅन्सलेशन आणि इतर नियम वाढवले आहेत. विमान कंपन्यांचीदेखील हीच स्थिती आहे. वर्दळीच्या ठिकाणी कंपन्यांनी विमानाच्या फेऱ्या वाढवल्या आहेत; पण तिकिटांचे दर जवळपास दुप्पट केले आहेत.

विमान तिकिटांच्या आगाऊ नोंदणीत घट

पर्यटकांकडून उन्हाळी सुट्ट्यांचे नियोजन एक-दीड महिना आधी सुरू होत असले, तरी ट्रॅव्हल कंपन्यांचे नियोजन पूर्वी सहा महिने आधीच सुरू होत असे. विमान कंपन्यांकडून वेगवेगळे करार करून सवलतीच्या दरात मोठ्या संख्येने तिकिटांचे बुकिंग करण्याची ट्रॅव्हल कंपन्यांची पद्धत होती. दोन वर्षांत करोनाच्या एकापाठोपाठ आलेल्या लाटांमुळे अनेकांचे नियोजन कोलमडले. आर्थिक नुकसान झाले. सततची अस्थिरता लक्षात घेऊन काही ट्रॅव्हल कंपन्या विमानप्रवासाशिवाय ‘सहलीचे पॅकेज’ जाहीर करीत आहेत.

परदेश सहल श्रीलंका, बालीपर्यंतच

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवासाचे निर्बंध अनेक देशांनी शिथिल केले आहेत. गेल्या महिनाभरापासून बाली, श्रीलंका, थायलंड, सिंगापूर, मलेशिया या देशांत सहली जाऊ लागल्या आहेत. पर्यटकांमध्ये अजूनही ‘आरटीपीआर’ची चाचणी आणि इतर निर्बंधांची भीती आणि संभ्रम आहे. मात्र, गेल्या महिनाभरात हळूहळू प्रतिसाद वाढत असल्याचे निरीक्षण पर्यटन कंपन्यांनी नोंदवले आहे.

पर्यटकांमध्ये फिरण्याचा आत्मविश्वास वाढल्याने उन्हाळी सुट्ट्यांमुळे पर्यटकांचा सहलींना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काश्मीर, चारधाम यात्रा जूनपर्यंत ‘ओव्हर पॅक’ झाल्या आहेत. श्रीनगर, पहेलगाम, सोनमर्ग, गुलमर्ग ही ठिकाणे लोकप्रिय आहेत. लोकांना हिलस्टेशन, निसर्गसौंदर्याचे आकर्षण आहे; काश्मीरबद्दलही कुतूहल आहे. त्यामुळे सहली वाढल्या आहेत. केदारनाथ, गंगोत्रीसह एकूणच चारधाम यात्रेचे बुकिंग जोरात आहे.

– विवेक गोळे,

संचालक, भाग्यश्री टूर्स

उन्हाळ्यामुळे थंड हवेच्या ठिकाणांना अधिक मागणी आहे. देशांतर्गत पर्यटनात काश्मीरला उच्चांकी प्रतिसाद मिळाला असून, हिमाचल, उत्तराखंडमध्ये पर्यटक मोठ्या संख्येने जात आहेत. काश्मीरमधील काही ठिकाणी मागणी जास्त आणि हॉटेल कमी अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हॉटेलचालकांनी दुप्पट, तिप्पट दर वाढवले आहेत. उत्साही पर्यटकांमुळे पर्यटन क्षेत्राला पूर्वीप्रमाणे चालना मिळाली आहे, हा सकारात्मक बदल आहे.

– नीलेश भन्साळी,

संचालक, ट्रॅव्हल एजंट असोसिएशन ऑफ पुणे