पर्यटनाला चालना
पर्यटन

पर्यटनाला चालना

करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे कोलमडलेल्या पर्यटन क्षेत्राला लसीकरण मोहिमेमुळे चालना मिळाली आहे. ज्येष्ठ नागरिकांसह तरुणांनीही आता करोना प्रतिबंधक दोन डोस घेतल्याने पर्यटकांनी लांब पल्ल्याच्या सहली सुरू केल्या आहेत. राज्यातील थंड हवेच्या ठिकाणांबरोबरच काश्मीर, राजस्थान, हिमाचल प्रदेशला पर्यटकांची पसंती मिळते आहे.

करोनाचा प्रादुर्भाव आणि नंतर लॉकडाउनच्या प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या नियमांमुळे गेल्या दीड वर्षापासून देशभरातील पर्यटन ठप्प झाले होते. करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर काही राज्यांनी पर्यटन सुरू केले; पण राज्यातील परिस्थिती गंभीर असल्याने शहरातून बाहेर पडण्यासाठीची बंधने कायम होती. दुसऱ्या लाटेत पुन्हा एकदा पर्यटन क्षेत्र कोलमडले. गेल्या महिनाभरात १८ वर्षांच्या पुढील नागरिकांचा लसीकरणाचा दुसरा डोस सुरू झाल्यापासून पर्यटन कंपन्यांचे फोन खणखणायला सुरुवात झाली आहे. बहुतांश राज्यांनीही करोनाचे दोन डोस घेतलेल्या पर्यटकांसाठी अनेक नियम शिथिल केल्याने प्रतिसाद वाढला आहे.

राज्याचा विचार केल्यास कोकणातील लोकप्रिय रिसॉर्ट, सर्व थंड हवेच्या ठिकाणांतील हॉटेल बुकिंगचे प्रमाण ५० ते ७० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. खासगी बंगले, फार्म हाउस बुकिंगचाही प्रतिसाद वाढला असून, सुट्टीच्या दिवशी मोठे गट करून पर्यटक सहलीसाठी बाहेर पडत आहेत. दिवाळीत पर्यटकांची संख्या पूर्वीप्रमाणे वाढेल, अशी पर्यटन कंपन्याची अपेक्षा आहे.

पर्यटक म्हणतात…

– लस घेतल्यामुळे फिरायला सुरक्षित वाटते.

– पुढची लाट येण्यापूर्वी फिरून घेऊ या.

– चाचण्यांचे निर्बंध कमी झाल्याने आता फिरायला हरकत नाही.

– लग्नानंतर निर्बंधांमुळे फिरायला जाता आले नव्हते.

– दिवाळीतील गर्दी वाढण्यापूर्वीच फिरायला जाणे योग्य.

– दीड वर्ष घरी बसून कंटाळा आला होता.

– निवांतपणा आणि दैनंदिन कामातून मोठा बदल हवा आहे.

व्हिसामुळे परदेशी पर्यटनास अडथळे

काही लहान-मोठ्या देशांनी आंतरराष्ट्रीय पर्यटनाचे दरवाजे सशर्त खुले केले आहेत. मान्यताप्राप्त करोना प्रतिबंधक लशीचे दोन डोस घेतलेल्या भारतीय नागरिकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटनास परवानगी मिळाली आहे. पर्यटकही बाहेर जाण्यास इच्छुक आहेत. मात्र, गेल्या दोन महिन्यांत व्हिसाच्या अर्जांचे प्रमाण काही पटीने वाढले आहे. त्यामुळे एरवी १५ दिवसांत मिळणाऱ्या व्हिसाला आता दीड महिन्याचा अवधी लागतो आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे परदेशातील सहली, दौरे प्रलंबित ठेवलेल्या नागरिकांसह पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात आलेल्या अर्जांमुळे काही देशांची व्हिसा प्रक्रिया कोलमडली आहे. युरोप, ब्रिटनसह काही देशांनी व्हिसा मिळाल्याशिवाय प्रवासाचे तिकिटही काढू नका, असे नागरिकांना आवाहन केले आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुणे विभागातील सर्व रिसॉर्टना पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाबळेश्वर, माथेरान, माळशेज, लोणावळा, कारला येथील रिसॉर्टचे बुकिंग सुटीच्या दिवशी ९० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन करून पर्यटन सुरू आहे. भीमांशकर मंदिर अजून खुले झाले नसल्याने आणि कोयना भागातील जोरदार पावसामुळे या दोन रिसॉर्टला इतरांच्या तुलनेत प्रतिसाद थोडा कमी आहे. लसीकरण झाल्याने पर्यटनाला चालना मिळाली आहे.

– दीपक हरणे,

प्रादेशिक व्यवस्थापक,

महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळ

लसीचे दोन डोस झाल्यामुळे नागरिकांनी सप्टेंबर आणि ऑक्टोबरसाठी नवीन उत्साहात पुन्हा एकदा पर्यटन सुरू केले आहे. सहलीसाठी पर्यटक नवीन ठिकाणांच्या शोधात आहेत. कौटुंबिक सहलींसह सर्व वयोगटांतील मित्रमैत्रिणींच्या ग्रुपही सहलींचे नियोजन करीत आहेत. नागरिकांकडून प्राधान्याने काश्मीर, लेह लडाख, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, गोव्याला सर्वाधिक मागणी आहे. पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेऊन संधीचा फायदा घेण्यासाठी या राज्यांतील हॉटेल, रिसॉर्टचालकांनी दरवाढ केली आहे.

– नीलेश भन्साळी,

देवम् टूर्स अँड ट्रॅव्हल्स