Pramod Bhagat Wins Gold: पॅरालिम्पिकमध्ये चौथे सुवर्ण, प्रमोदचा बॅडमिंटनमध्ये गोल्डन स्मॅश
क्रीडा

Pramod Bhagat Wins Gold: पॅरालिम्पिकमध्ये चौथे सुवर्ण, प्रमोदचा बॅडमिंटनमध्ये गोल्डन स्मॅश

टोकियो: जपानमध्ये सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने विक्रमी चौथे सुवर्णपदक जिंकले. जागतिक क्रमवारीतील अव्वल स्थानावर असलेल्या भारताचा पॅराबॅडमिंटनपटू प्रमोद भगतने सुवर्णपदक जिंकले. तर बॅडमिंटनमधील अन्य एका स्पर्धेत भारताच्या मनोज सरकारचा अंतिम फेरीत पराभव झाला. त्यामुळे त्याला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले.
प्रथमच पॅरालिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या प्रमोदने ब्रिटनच्या डॅनियल बेथेलचा एकतर्फी पराभव केला. पहिल्या गेममध्ये विजय मिळवल्यानंतर प्रमोद दुसऱ्या गेममध्ये मागे पडला होता. ४-११ असा पिछाडीवर असताना प्रमोदने दुसरा गेम २१-१७ असा जिंकला. आज (शनिवारी) भारताला मिळालेले हे दुसरे सुवर्णपदक आहे.
३३ वर्षीय प्रमोदने SL3 क्लास स्पर्धेत जपानच्या दाइसुके फुजीहाराचा २१-११, २१-१६ असा पराभव करून अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. पोलियोमुळे प्रमोदचा पाय वयाच्या पाचव्या वर्षी दिव्यांग झाला होता. प्रमोदने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ४ सुवर्णासह ४५ आंतरराष्ट्रीय पदक जिंकली आहेत. BWF वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ८ वर्षात त्याने दोन सुवर्ण आणि एक रौप्य जिंकले आहे. २०१८च्या पॅरा आशिया स्पर्धेत त्याने एक रौप्य आणि एक कांस्य जिंकले होते.
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये आता भारताच्या पदकांची संख्या १७वर पोहोचली आहे. पदकतालिकेत भारत २४व्या स्थानावर आहे.