झुणका-भाकरी, सोलकढी आणि बरंच काही… करिना-करिश्माने मारला मराठमोळ्या जेवणावर ताव!
सिनेमा

झुणका-भाकरी, सोलकढी आणि बरंच काही… करिना-करिश्माने मारला मराठमोळ्या जेवणावर ताव!

मुंबई: अभिनेत्री करिना कपूर आणि करिश्मा कपूर (Kareena Kapoor and Karishma Kapoor) त्यांच्या फिटनेससाठी प्रसिद्ध आहेत. खास करून करिना कपूर आजही तिच्या फिगरसाठी ओळखली जातो. दोन्ही बाळंतपणानंतर करिनाची फिगर ही पूर्वीसारखीच आकर्षक आहे. अर्थात यासाठी ती वर्कआऊट करून मेहनत घेत असते. त्याचप्रमाणं तिचा आहारही तितकाच महत्त्वाचा आहे. करिनाचा आहार हा न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर (Rujuta Divekar) यांनी आखून दिलेला आहे. त्यात अनेक पारंपरिक महाराष्ट्रीयन पदार्थांचाही समावेश आहे हे विशेषच म्हणावे लागेल.

करिना आणि करिश्मा कपूर दोघी बहिणी शनिवारी दुपारी न्यूट्रिशनिस्ट ऋजुता दिवेकर यांच्याकडे जेवणासाठी गेल्या होत्या. त्यावेळी जेवणामध्ये पारंपरिक महाराष्ट्रीय पदार्थांचा समावेश होता. करिश्मानं जेवणाच्या ताटाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये या दोघींनी दिवेकरांच्या घरी ज्वारीची भाकरी, झुणका, अंबाडीची भाजी, कोथिंबीर वडी, सोलकढी, भोपळ्याचं भरीत या पदार्थांचा आस्वाद घेत त्याच्यावर ताव मारला.

या फोटोंमध्ये करिनानं पांढऱ्या रंगाचा खादीचा शर्ट आणि पँट घातली आहे. तर करिश्मानं स्ट्रीप असलेल्या पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. ऋजुता यांनी देखील त्यांच्या इन्स्टाग्रामवर करिना आणि करिश्मा बरोबरचे फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्यांनी म्हटलं आहे की, ‘तिन्ही खवय्यांची कंपनी… जेवणावर मनापासून प्रेम करणाऱ्यांबरोबर आजचं जेवण. कोणताही हेतू, किंतू परंतु न बाळगता आणि कॅलरीचा विचार न करता जेवणं हे सर्वात मोठं गिफ्ट आहे…’

दरम्यान, ऋजुता या त्यांच्या सोशल मीडियावरून आहारासंदर्भातील अनेक मौल्यवान टीप्स शेअर करत असतात. तसंच आपल्या जेवणामध्ये पारंपरिक भारतीय, खास करून महाराष्ट्रीयन पदार्थांचा समावेश करावा, असं त्या आवर्जून सांगतात.