परदेशात मालमत्ता खरेदी, शेअर्समध्ये गुंतवणूक करायचीय; अशी करा तयारी, जाणून घ्या अटी व शर्ती
अर्थविश्व

परदेशात मालमत्ता खरेदी, शेअर्समध्ये गुंतवणूक करायचीय; अशी करा तयारी, जाणून घ्या अटी व शर्ती

नवी दिल्ली : तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओमध्ये आणखी वैविध्य आणायचे असल्यास तुम्ही भारतातील तसेच इतर देशांतील शेअर बाजार, म्युच्युअल फंड आणि मालमत्तांमध्ये गुंतवणूक करू शकता. एका आर्थिक वर्षात उदारीकृत रेमिटन्स योजनेअंतर्गत कोणताही भारतीय परदेशात २.५ लाख डॉलर्सपर्यंत गुंतवणूक करू शकतो.

तसेच अत्यंत श्रीमंत व्यक्ती परदेशातील गुंतवणूक पर्यायांचा मोठ्या प्रमाणावर शोध घेत असतात आणि गुंतवणूक करतात. पण आंतरराष्ट्रीय म्युच्युअल फंड आणि एक्सचेंज ट्रेडेड फंड देखील किरकोळ गुंतवणूकदारांना Apple Inc. किंवा Meta (फेसबूक) सारख्या प्रसिद्ध जागतिक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देत आहेत.

त्यामुळे जर तुम्ही परदेशी कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर खालील बाबी नक्की वाचा आणि कंपनीची मूलभूत माहिती, आर्थिक आणि वैधानिक फाइलिंगचा अभ्यास करा. याबद्दलची माहिती अनेक प्लॅटफॉर्मवर मोफत उपलब्ध आहे, तिथून गुंतवणूकदारांना मदत मिळू शकते. जर तुमच्याकडे याबद्दल अभ्यास करण्यासाठी वेळ नसेल, तर तुम्ही म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकता, तसेच HNI गुंतवणूकदारांच्या पसंतीच्या रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतवणूक करू शकता. पण परदेशात गुंतवणूक करण्याचे कारण आणि गुंतवणूक कशी, कुठे करावी तर त्यावर तुम्हला किती कर लागू पडेल याबाबत जाणून घेऊया.

अमेरिकी शेअर बाजारात गुंतवणूक
अमेरिकेसारख्या विकसित बाजारपेठेमुळे तुम्हाला तंत्रज्ञानाच्या मदतीने विविध उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळते. येथे तुम्ही वेगवेगळ्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी करू शकता. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती सर्च इंजिन, सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स सारख्या क्षेत्रातील स्टॉकमध्ये गुंतवणूक करू शकते. यामध्ये गुगल, फेसबुक, अॅपल आणि टेस्ला यांसारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. तसेच तुम्ही परदेशी स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध केलेले शेअर्स खरेदी करू शकता. तर म्युच्युअल फंड योजनांचे युनिट्स देखील खरेदीसाठी उपलब्द आहेत, जे अधिक सुलभ आणि स्वस्त आहेत.

काय खरेदी करावे, कोणता पर्याय चांगला?
परदेशातील गुंतवणुकीसंदर्भात अनेक ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर याबाबत महत्त्वाची माहिती उपलब्ध आहे. येथे उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तुम्ही समभाग खरेदी करण्याबाबत योग्य निर्णय घेऊ शकता. याशिवाय तुम्ही थेट म्युच्युअल फंडातही गुंतवणूक करू शकता. काही भारतीय फंड विदेशी समभागांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी देखील देतात.

किती पैसे गुंतवू शकतो?
एका आर्थिक वर्षात उदारीकृत रेमिटन्स योजनेअंतर्गत कोणताही भारतीय परदेशात २.५ लाख डॉलर्सपर्यंत गुंतवणूक करू शकतो. परदेशातील गुंतवणुकीसाठी किमान रक्कम नसली तरी, ब्रोकरने तुमच्या व्यापाराबाबत विशिष्ट आवश्यकता किंवा अटी सेट केल्या असतील.

परदेशातील गुंतवणुकीच्या कमाईवर किती कर आकारला जाणार?

भारतीय नागरिकांना इतर देशांमध्ये असलेल्या परकीय मालमत्तेद्वारे मिळणाऱ्या उत्पन्नावरही कर भरावा लागतो. हा त्यांच्या भारतातील एकूण उत्पन्नाचा एक भाग असेल. त्यात अशा मालमत्तेच्या विक्रीतून मिळणाऱ्या नफ्याचाही समावेश होतो. अशा करदात्यांना त्यांच्या मालमत्तेतून होणारा नफा आणि परदेशातील इतर गुंतवणुकीची माहिती आयकर विभागाला देणे बंधनकारक आहे. या मालमत्ता आणि गुंतवणुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर आयकर विभागाच्या विद्यमान अटींनुसार कर आकारला जातो.