आनंद दिघे यांच्यावरून एकनाथ शिंदे ठाकरेंना का धमकवतात? २ कारणं आणि बाळासाहेब कनेक्शन!
ताज्या बातम्या

आनंद दिघे यांच्यावरून एकनाथ शिंदे ठाकरेंना का धमकवतात? २ कारणं आणि बाळासाहेब कनेक्शन!

मुंबई : नुकतेच शिवसेनेच्या दोन्ही गटांचे दसरा मेळावे मुंबईत पार पडले. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. यामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांचा नामोल्लेख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांच्याही भाषणात होता. आनंद दिघे यांच्या मृत्यूप्रकरणावरुन एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंवर गंभीर आरोप केला. दिघे यांच्या मृत्यूनंतर ठाकरेंनी मला त्यांच्या संपत्तीबद्दल विचारणा केली. त्यांची संपत्ती किती आहे आणि कुठे कुठे आहे, याबद्दलची माहिती ठाकरेंनी माझ्याकडून घेण्याचा प्रयत्न केला, असा सनसनाटी आरोप करुन मुख्यमंत्री शिंदे यांनी खळबळ उडवून दिली. गेल्या महिन्यातही एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांच्यावरुन ठाकरेंवर असेच आरोप केले होते. मला भरपूर काही सांगायचं आहे. मला भरपूर काही बोलायचं आहे. मी ज्यावेळी बोलेन त्यावेळी भूकंप होईल, असा इशारा एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना दिला होता. त्यानंतर कालच्या दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी त्याच प्रकरणावरुन वात पेटवली. परंतु प्रश्न असा आहे की-एकनाथ शिंदे वारंवार दिघेंवरुन ठाकरेंना का धमकावतायेत? दिघेंना केंद्रस्थानी ठेऊन ठाकरेंवर वार का करतायेत? भूतकाळात याचे काही संदर्भ दडलेले आहेत का? याच प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून जाणून घेऊ…

आनंद दिघे… एक सच्चा-कट्टर आणि कडवट शिवसैनिक… बाळासाहेब ठाकरे यांच्या कामाच्या स्टाईलने भारावलेला सैनिक..अगदी तरुणपणीच शिवसेनेत काम करायला त्यांनी सुरुवात केली. नंतर शिवसेना एवढी रक्तात भिनली की कौटुंबिक सुखाचा त्याग करुन, शिवसेनेलाच कुटुंब मानून ते शेवटच्या श्वासापर्यंत भगव्यासाठी लढले. अन् उद्धव ठाकरे म्हटल्याप्रमाणे जातानाही भगव्यातच गेले. पण त्यांच्या त्याच अपघाती मृत्यूची संपूर्ण देशभर मोठी चर्चा झाली. यावरुन नंतरच्या काळात बरेच आरोप प्रत्यारोपही झाले. या आरोपांचा रोख होता ठाकरे कुटुंबाकडे…!

आनंद दिघेंचा जन्म २७ जानेवारी १९५२ सालचा. ठाण्यातल्या टेंभी नाका परिसरात ते राहायला होते. ठाण्यात पूर्वी काँग्रेसचं वर्चस्व होतं. पण शिवसेनेच्या स्थापनेनंतर मराठी माणसांची संघटना म्हणून आणि त्याकाळी बाळासाहेबांच्या कामाने भारावून अनेक तरुण पदाधिकाऱ्यांनी सेनेचा भगवा ध्वज हाती घेतला. त्यात आनंद दिघेही होते. ठाण्यात किंबहुना टेंभी नाका परिसरात बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा व्हायच्या. आनंद दिघे बाळासाहेबांच्या सभांना आवर्जून उपस्थित राहायचे. बाळासाहेबांचा शब्दनशब्द कानात साठवायचे. दिघे यांच्यावर बाळासाहेब नावाचं एवढं गारुड होतं की दिघेंनी आपलं वैयक्तिक आयुष्यच ठेवलं नाही. त्यांनी शिवसेनेच्या कामाला वाहून घेतलं. ते घरीही जात नसत. शिवसेनेच्या शाखेतच राहायचे. दिवसरात्र फक्त आणि फक्त शिवसेना कशी वाढेल, शिवसेनेचं संघटन कसं मजबूत होईल, याचाच विचार ते करत असत.

दिघेंच्या कामाची स्टाईल खूपच लोकप्रिय होती. आनंदाश्रमात त्यांचा जनता दरबार भरायचा. अडले नडले लोक त्यांच्याकडे कामं घेऊन यायची. बघतो, करतो… अशी त्यांच्या कामाची स्टाईल नव्हती. जिथल्या तिथे ते संबंधितांना फोन लावायचे. आलेल्या कार्यकर्त्याचं काम झालंच पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष असायचा. मग पोलिस स्टेशन असो वा सरकारी अधिकारी. लोकांच्या कामांसाठी ते सरकारी अधिकाऱ्यांनाही भिडायला मागेपुढे पाहत नसायचे. अनेकदा यावरुन वादही झाले. पण दिघे आपल्यासाठी लढतायेत, म्हणून लोकांचा त्यांना पाठिंबा मिळत गेला. लोकांचा पाठिंबा एवढा अभूतपूर्व होता की ‘ठाण्याचे बाळ ठाकरे’ म्हणून त्यांची ओळख झाली. यादरम्यान त्यांच्या कामामुळे ठाणे जिल्ह्याच्या शिवसेना जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी बाळसाहेबांनी त्यांच्यावर सोपवली होती. जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवल्यावर तर दिघे तहानभूक विसरले. दिवसातला प्रत्येक मिनिट ते शिवसेनेसाठी खर्ची करु लागले.

टेंभी नाक्यावरचा जनता दरबार, प्रति न्यायालय, आंदोलने यांमुळे दिघे कमालीचे फेमस झाले. याचदरम्यान हिंदुत्वाचा हुंकार टाकलेल्या बाळासाहेबांच्या साथीला साथ म्हणून दिघेंनी टेंभी नाक्यावर राज्यातला सर्वांत मोठा नवरात्रौत्सव सुरु केला. पुढे संस्कृती टिकवण्यासाठी, रुजवण्यासाठी दहीहंडी सुरु केली. पुढे त्यांची प्रतिमा ‘धर्मवीर’ म्हणून प्रोजेक्ट झाली. अल्पावधीत दिघे महाराष्ट्रभर लोकप्रिय झाले. इथेच माशी शिंकली.

दिघे यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे बाळासाहेब अवस्थ झाल्याची त्याकाळी चर्चा होती. नाकापेक्षा मोती जड होतोय, असं बाळासाहेबांना वाटायचं, अशीही चर्चा ‘मातोश्री’च्या वर्तुळात दबक्या आवाजात सुरु झाली. आपल्यापेक्षा कुणीतरी मोठा होतोय, अशी भावना बाळासाहेबांची झाल्याचंही त्याकाळचे पत्रकार सांगतात. बाळासाहेबांना आनंद दिघे यांच्या पक्षनिष्ठेविषयी किंचितही शंका नव्हती पण दिघे यांचं वाढतं वजन हे बाळासाहेबांसाठी चिंतेचं होतं. दरम्यान त्याही काळात दिघे काम करत राहिले, पक्षसंघटना वाढवत राहिले. ठाण्यात त्यांनी शिवसेना संघटना बांधली. त्यांच्या कामाचा झपाटा सुरूच होता, पण बाळासाहेबांच्या मनात दिघेंविषयीची सल कायम होती, असं सांगितलं जातं!

परंतु असं असलं तरी बाळासाहेबांच्या अत्यंत निकटवर्तीयांपैकी एक म्हणून आनंद दिघे यांची ओळख होती. बाळासाहेब कायमच आनंद दिघे यांचं कौतुक करायचे. आनंद दिघे म्हणजे माझा वाघ आहे, अशी शाबासकीची थाप त्यांनी अनेकदा दिघेंच्या पाठीवर दिली. आनंद दिघे यांचं ठाण्यावर निर्विवाद वर्चस्व होतं. ठाणे जिल्ह्यात शिवसेना वाढविण्याचं श्रेय आनंद दिघे यांनाच जातं. आनंद दिघेंनी ठाण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमांना बाळासाहेब आवर्जून उपस्थिती लावायचे. नवरात्र असो इतर कोणताही कार्यक्रम. ‘दिघेंचं निमंत्रण म्हणजे बाळासाहेब हजर’ असं समीकरण झालं होतं.

दरम्यानच्या काळात पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. दिघेंचं धडाकेबाज काम महाराष्ट्रभर पोहोचलं होतं. पण त्याचवेळी बाळासाहेबांची दिघेंच्या कामावर करडी नजर होती. २४ ऑगस्ट २००१ हा तोच दिवस, ज्या दिवशी गणोशोत्सवानिमित्त दिघे कार्यकर्त्यांच्या घरी भेटी देत होते. ठाणे शहरात त्यांचा दौरा सुरु होता. त्याच दिवशी दिघे यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झालं आणि डोक्याला मार लागला. अपघातानंतर त्यांना ठाण्याच्या सिंघानिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. तिथं त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अपघातानंतर दोन दिवसांनी म्हणजेच २६ तारखेच्या दुपारी त्यांच्या पायावर ऑपरेशन करण्यात आलं. पण त्याच संध्याकाळी त्यांची तब्येत खालावू लागली. दरम्यान शिवसेनेचे अनेक नेतेमंडळी त्यांना दवाखान्यात भेटून आली. त्यावेळी दिघे त्यांच्याशी हसतमुखाने बोलले. नेत्यांनीही दिघे लवकर बरे होतील, अशी मनोकामना केली. पण घडाघडा बोलणाऱ्या दिघेंना अचानक २६ तारखेच्या सायंकाळी हृदयविकाराचा झटका आला. सायंकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी दिघेंना पहिला झटका आला. तर पुढच्या दहाच मिनिटांत दिघेंना पुन्हा दुसरा झटका आला. रात्री १०.३० वाजता अखेर सिंघानिया हॉस्पिटलमध्ये आनंद दिघेंनी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळी दिघे फक्त 50 वर्षांचे होते.

आनंद दिघेंचं निधन झालं, हे वृत्त समोर येऊन कुणी सांगायला तयार नव्हतं. अखेर उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन दिघे यांच्या निधनाची माहिती दिली. उद्धव ठाकरे यांच्या माहितीनंतर, ठाण्यात वादळ पेटलं. शिवसैनिक आक्रमक झाले. एकच धुमश्चक्री उडाली. आक्रमक शिवसैनिकांनी जिथे दिघे उपचार घेत होते, त्या सिंघानिया रुग्णालयाची नासधूस केली. रुग्णालय जाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तत्कालिन गृहमंत्री छगन भुजबळ यांनी ३४ शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. पण रुग्णालयाच्या नासधूसीप्रकरणी रुग्णालयाचे मालक विजयपत सिंघानिया यांनी मात्र संतप्त प्रतिक्रिया दिली होती. आपण पाकिस्तानला दहशतवादी राष्ट्र म्हणतो. पण ठाणे त्याहून वेगळं आहे का? शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी आमची माफी मागावी, अशी मागणी विजयपत सिंघानिया यांनी केली होती.

दिघेंच्या मृत्यूनंतर त्यांचा अपघाती मृत्यू नसून त्यांचा घातपात झाला, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरु झाली. त्यांच्या मृत्यूच्या संशयाची सुई बाळासाहेब ठाकरे यांच्यावर होती. माजी खासदार निलेश राणे यांनी तर आनंद दिघे यांच्या हत्येसाठी बाळासाहेब ठाकरे जबाबदार आहेत, असा उघड उघड आरोप केला. ठाण्यातही अनेक वेळा अशी चर्चा ऐकायला मिळते. या सगळ्या प्रकरणाची त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्रभर मोठी चर्चा झाली. यावर बाळासाहेब कधीही उघड बोलले नाहीत वा दिघे कुटुंबीयांनी देखील कधी कुठली वेगळी भूमिका मांडली नाही.

पण शिवसेनेत फूट पडली आणि बंडखोरी केल्यापासून एकनाथ शिंदे यांनी दिघे यांच्या नावाचा जप सुरू केला. सरकार स्थापन होऊन जवळपास ३ महिने झालेत, यात आनंद दिघे यांचं नाव शिंदेंनी घेतलं नाही, असा एक दिवस गेला नसेल… शिंदेंनी दोन चार वेळा दिघे यांच्यावरून ठाकरेंना धमकी दिली, मला भरपूर काही बोलायचं आहे, मला भरपूर काही सांगायचं आहे, मी ज्यावेळी सांगेन, त्यावेळी भूकंप होईल, असं शिंदे मागील महिन्यात म्हणाले. काल त्यांनी दिघे यांच्या संपत्तीवरून ठाकरे यांना टार्गेट करून वात तर पेटवली, पण दिघेंच्या मृत्यूबद्दल येत्या काळात धक्कादायक गौप्यस्फोट करून फटाक्यांची माळ लावणार का? आणि त्यातून त्यांना सांगायचंय ते कधीही न समोर आलेलं सत्य बाहेर येणार का? हे पाहणं महत्वाचं आहे!

दुसरीकडे दिघेंवरुन शिंदे यांचे कथित आरोप उद्धव ठाकरे यांनी काल एकप्रकारे फेटाळून लावले. दिघे यांच्या एकनिष्ठतेचा दाखला देत उद्धव ठाकरे म्हणाले, “ज्या दिघेंचं नाव ते घेतात, ते शेवटपर्यंत शिवसेनेशी एकनिष्ठ राहिले. जातानाही भगव्यात लपेटून गेले. त्यांनी कधीच शिवसेनेशी गद्दारी केली नाही. आता त्यांच्यावरुन काहीबाही सांगत दिशाभूल करण्याचा प्रयत्न त्यांनी सुरु केलाय. कारण ज्यांच्यावर बोलायचंय, ते आता हयात नाही. खरं काय-खोटं काय सांगायला ते आता आपल्यात नाहीत… त्यामुळे सगळे उद्योग सुरु आहेत”