क्रिकेटमधील सर्वात धोकादायक चेंडू; फलंदाज थोडक्यात बचावला
क्रीडा

क्रिकेटमधील सर्वात धोकादायक चेंडू; फलंदाज थोडक्यात बचावला

कराची: इंग्लंडचा संघ सात सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर आला आहे. मालिकेतील तिसरी लढत शुक्रवारी कराची येथील नॅशनल स्टेडियमवर झाली. या सामन्यात इंग्लंडने ६३ धावांनी विजय मिळवत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.

प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने २२१ धावा केल्या उत्तरादाखल पाकिस्तानला १५८ धावाच करता आल्या. मालिकेतील पहिली लढत इंग्लंडने तर दुसरी लढत पाकिस्तानने जिंकली होती.

या सामन्यातील एक घटना संपूर्ण क्रिकेट विश्वात चर्चेत आली आहे. इंग्लंडचा युवा फलंदाज हॅरी ब्रूकने या सामन्यात ३५ चेंडून ८ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ८१ धावांची वादळी खेळी केली. मात्र मॅच मध्ये अशी एक घटना झाली ज्यात तो थोडक्यात बचावला.

तिसऱ्या टी-२० सामन्यातील १७व्या षटकात हरिस रउफ गोलंदाजी करत होता. ओव्हरमधील चौथा चेंडू ब्रूकने पुल करण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या बाजूला लागला आणि थेट हेल्मेटच्या ग्रिलमध्ये घुसला. या घटनेमुळे सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. इंग्लंडचे फिजिओ तातडीने मैदानात आले. पण ब्रूकला कोणतीही दुखापत झाली नव्हती. त्यानंतर त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई सुरुच ठेवली.

चौथ्या चेंडूवर झालेल्या या प्रकारानंतर ब्रूकने चौकार मारत त्याला उत्तर दिले. त्याच षटकात त्याने २४ चेंडूत पहिले आंतरराष्ट्रीय टी-२० मधील अर्धशतक पूर्ण केले.