Jasprit Bumrah : बुमराह वर्ल्डकप खेळणार की नाही, अखेर राहुल द्रविड बोललाच
क्रीडा

Jasprit Bumrah : बुमराह वर्ल्डकप खेळणार की नाही, अखेर राहुल द्रविड बोललाच

Rahul Dravid : भारत ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी जय्यत तयारी करत आहे. मात्र या तयारीला दुखपतींचा गालबोट लागले. रविंद्र जडेजा पाठोपाठ वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह देखील दुखापतग्रस्त झाला. तो वर्ल्डकपला मुकणार असे वृत्तही झळकले. मात्र बीसीसीआयने अजूनपर्यंत त्याबाबत कोणती अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दोन टी 20 सामन्यांसाठी त्याच्या जागी मोहम्मद सिराजला संधी देण्यात येईल अशी घोषणा केली. दरम्यान, संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडने जसप्रीत बुमराहच्या वर्ल्डकप खेळण्याबाबत वक्तव्य केलं आहे. (Rahul Dravid Statement Over Injured Jasprit Bumrah)

जसप्रीत बुमराहच्या पाठीला स्ट्रेस फ्रॅक्चर झाले आहे. ही गंभीर दुखापत असल्याने तो येत्या 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलियात सुरू होणाऱ्या टी 20 वर्ल्डकपसाठी उपलब्ध होणार की नाही याबाबत अजून स्पष्टता दिसून येत नाहीये. दरम्यान, संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने बुमराहबाबत अपडेट दिली आहे.

राहुल द्रविड म्हणाला, ‘आताच्या घडीला तरी तो दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी 20 मालिकेला मुकला आहे. तो राष्ट्रीय क्रिकेट अॅकेडमीत गेला असून त्याबाबत पुढे कोणता निर्णय घेतला जाणार आहे याबाबतच्या अधिकृत माहितीची वाट पाहत आहोत. सध्याच्या घडीला तर तो फक्त या मालिकेसाठी संघात नसणार. आम्ही पुढच्या 2 ते 3 दिवसात काय होतं हे पाहू. अधिकृतरित्या कोणती माहिती मिळाली की आम्ही तुमच्याशी ती शेअर करू.’

द्रविड पुढे म्हणाला की, ‘मी सांगितल्याप्रमाणे मी मेडिकल रिपोर्टच्या खोलात गेलेलो नाही. माझ्याकडे जे जाणकार आहेत त्यांनी दिलेली माहिती तेवढीत आहे. त्यांनी या मालिकेसाठी त्याला विश्रांती दिली आहे. त्याच्या दुखापत मॉनिटर केली जात आहे. तुम्हाला पुढे काय होईल हे माहिती करून घेण्यासाठी थोडा वेळ वाट पहावी लागेल. जोपर्यंत तो अधिकृतरित्या वर्ल्डकप खेळणार नाही हे निश्चित होत नाही तोपर्यंत आम्ही कायम त्याच्याबाबतीत आशावादी राहू.’

जसप्रीत बुमराह जवळपास 2 महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. तो ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी 20 मालिकेत शेवटचे दोन सामने खेळला. पहिल्या सामन्यात त्याने 2 षटकात 23 धावा देत 1 विकेट घेतली. तर दुसऱ्या सामन्यात त्याने 4 षटकात 50 धावा दिल्या होत्या.