आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की…
सिनेमा

आदिपुरुषचा टीझर पाहून टीव्हीवरचा लक्ष्मणही भडकला, म्हणाला हे रामायण आहे की…

मुंबई: आदिपुरुष सिनेमा प्रदर्शित व्हायला अजून तीन महिने बाकी आहेत पण सिनेमाचा टीझर रिलीज झाल्यापासून आदिपुरुषमधील पडद्यावर दिसणाऱ्या व्यक्तीरेखांच्या लूकवरून वादाची ठिणगी पडली आहे. तान्हाजी फेम ओम राऊत याने हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. काही लोकांनी सैफ अली खानच्या ऑनस्क्रिन रावणावर आक्षेप घेतला आहे तर काहीलोकांनी या सिनेमातील व्हिएफएक्स कृत्रिम वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. एकूण काय तर आदिपुरुषला सगळीकडूनच वादाचा विळखा पडत आहे. अशातच आता लोकप्रिय रामायण मालिकेत लक्ष्मणची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील लहरी यांनीही आदिपुरुष कार्टून फिल्मसारखी आहे असं मत व्यक्त केलय.

आदिपुरुष सिनेमातील रावणाचा लूक हा तालिबानी दिसत असल्याची कमेंट महाभारतातील दुर्योधनची भूमिका केलेल्या पुनीत इस्सार यांनी केली होती. त्यापाठोपाठ आता लक्ष्मण फेम सुनील लहरी यांनी या सिनेमापेक्षा आमची रामायण मालिकाच प्रेक्षणीय असल्याचं बोलत आदिपुरुषचा समाचार घेतला आहे. रामायण मालिकेत आजचं व्हीएफएक्स तंत्रज्ञान नसूनही तंत्रज्ञ कलाकारांनी मेहनतीने दृश्य साकारली होती., एकेक सीन चारदिवस दिवस शूट केला होता. आजच्या काळात असे मेहनत घेणारे कलाकार नसल्याने व्हीएफएक्सचा आधार घ्यावा लागत आहे. ३५ वर्षानंतरही लोक रामायण मालिकेची आठवण काढतात यातच सगळं काही आहे.

आदिपुरुष सिनेमाचा टीझर पाहूनच हा सिनेमा कसा असेल हे कळाले. कार्टून सिनेमासारखा हा बालीश असल्याचंही सुनील यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. आदिपुरुष सिनेमातील राम असो, रावण असो किंवा हनुमान असो, ती पात्र आपली वाटत नाहीत त्यामुळे हा सिनेमा किती पचनी पडेल ही शंकाच आहे. तंत्रज्ञानाच्या जोरावर आदिपुरुष बनवला असला तरी त्यातील व्यक्तीरेखांवर काहीच काम झालेलं नाहीअसंही सुनील म्हणाले.

आदिपुरुष सिनेमा सध्या यातील व्यक्तीरेखांच्या लूकवरून वादात अडकला आहे. रामाला मिशा दाखवण्यात आल्याने प्रेक्षक नाराज आहेत. तर रावण हा खिलजी वाटत असल्याच्या कमेंट सोशलमीडियावर आल्या आहेत. ब्राह्मण महासभेने तर दिग्दर्शक ओम राऊत याला कायदेशीर नोटीस पाठवून यातील वादग्रस्त सीन हटवण्याची मागणी केली आहे. आमदार राम कदम यांनी या सिनेमाच्या प्रदर्श्यनाला विरोध केला आहे. या सिनेमात प्रभास रामाच्या भूमिकेत, क्रीती सेनन सीतेच्या भूमिकेत आहे. सैफ अली खान रावण तर देवदत्त नागे हनुमान साकारणार आहे. १२ जानेवारी २०१३ ला सिनेमा रिलीज होणार आहे,